शेंद्रा कंपनीतले प्लास्टिक गोडाऊन जळून खाक संपूर्ण कच्चामाल आगेत जळाला; सहा तासापासून आग विझविण्यासाठी प्रयत्न

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) : शेंद्रा औद्योगिक परिसरात आज सकाळी सातच्या सुमारास एका प्लास्टिक कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. तिरुपती एंटरप्राइजेस या कंपनीच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या या आगीत प्लास्टिक निर्मितीसाठी कच्चा माल संपूर्ण जळून खाक झाला आहे. त्यामुळे कंपनी मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळी सात वाजता घटना घडताच अग्निशमन विभागाला तातडीने माहिती देण्यात आली. सूचना मिळताच अग्निशमन अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी सकाळी सातपासून दुपारी बारा वाजेपर्यंत सलग प्रयत्न करण्यात आले. आगीचे स्वरूप अत्यंत भीषण असल्याने ती विझवण्यासाठी सात ते आठ पाण्याचे टँकर तसेच दहा ते बारा अग्निशमन गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या. आग विझविण्याच्या कामात ड्युटी इंचार्ज सोमनाथ भोसले, फायरमन दीपक लव्हाडे, परमेश्वर साळुंके, नंदकुमार आरखं तसेच वाहनचालक विनोद तुपे आणि इतर कर्मचार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न केले. दुपारपर्यंत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरूच होते.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज
शेंद्रा येथील प्लास्टिक रॉ मटेरीयल गोडाऊनला आग लागली. मात्र आग लागली कशी? याचा शोध घेणे सुरू आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून, याबाबत अधिक तपास सुरू आहे. मात्र आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज नागरिकांनी वर्तविला असल्याचे अग्निशमन अधिकारी यांनी सांगितले.

मोठा अनर्थ टळला
सकाळची वेळ असल्याने कंपनीत काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे गोडाऊनमध्ये कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हते. परिणामी, या मोठ्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तसेच बाजूलाच वसाहत असल्याने घर होते. परंतु आग विझविण्यासाठी सुरुवातीला वसाहतीच्या बाजूलाच आग सुरुवातीला विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, प्लास्टिक उत्पादनासाठी वापरला जाणारा संपूर्ण कच्चा माल जळाल्याने कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानाची अचूक रक्कम अद्याप स्पष्ट झालेली नाही.